Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्यामुळे त्यांनी जिमला जाऊ नये, त्याउलट हिंदू मुलींनी घरातच योगा करावा, असा अजब सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. पडळकर यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हे वक्तव्य केले आहे. पडळकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत सांगितले की, ‘ते’ हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. “हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे माहित नाही अशा जिममध्ये जाऊ नका. घरी योगा केल्यास बरे होईल. हे किती मोठे षड्यंत्र आहे हे तुम्हाला माहिती नाही. हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा व्यायाम करावा. त्यांना जिममध्ये जाण्याची गरज नाही,” असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी यामागे एक मोठा कट असल्याचा इशारा दिला. Gopichand Padalkar | कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी याशिवाय पडळकर यांनी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली. ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत अशा तरुणांची देखील तपासणी झाली पाहिजे. अशा लोकांना कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी. यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करावी लागेल. तेव्हाच अशा घटनांना आळा घालता येईल. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Gopichand Padalkar | ‘आम्ही गावांची नावं बदलून टाकू’ दरम्यान, बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे हे सरकार आहे. विरोधक लहान मुलांसारखं रडल्यासारखं आव आणतात. तुम्ही कायद्याच्या देशात राहत आहात. मग अहिल्यानगर असं म्हणण्यात काय गैर आहे? कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहावं लागेल. मुलांच्या दाखल्यांवरही हे नाव येणार आहे. मुघल औरंगजेब यांसारखी नावं पुसली पाहिजेत. बीड जिल्ह्यात जहांगीर मोहा नावाचं गाव आहे. त्याचं नावही बदललं पाहिजे. अशा गावांची नावं मुघलांच्या वारसांवरून ठेवलेली आहेत. ती मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आम्ही गावांची नावं बदलून टाकू’, असं पडळकरांनी स्पष्ट केलं. Gopichand Padalkar | दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. हेही वाचा: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला ; सेन्सेक्स ११० अंकांनी वधारला, निफ्टीने २५,६०० चा टप्पा ओलांडला