Pratap Sarnaik : हिंदी आता मुंबईची बोलीभाषा अन् आमची लाडकी बहीण; प्रताप सरनाईकांच्या विधानावरून वादंग

Pratap Sarnaik : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे,” या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. मराठी भाषेच्या वापराबाबत राज्यात काही दिवसांपूर्वीच वातावरण तापले असताना, सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
सरनाईक यांनी ठाणे व मिरा भाईंदर मतदारसंघातील भाषिक विविधतेचा उल्लेख करताना म्हटले की, “हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे असं म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे,” असं प्रताप सरनाईक म्हणाले.
भाजप-शिवसेना वाद
या विधानाच्या पार्श्वभूमीवर, मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. भाजप नेते दिलीप जैन यांनी सरनाईकांवर आरोप केला आहे की, त्यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून 150 कोटींचा निधी त्यांच्या मालमत्तेच्या फायद्यासाठी वापरला आहे . या आरोपांवर सरनाईकांनी चौकशीची मागणी केली आहे आणि या आरोपांना फेटाळले आहे.
प्रताप सरनाईकांच्या विधानामुळे मुंबईतील भाषिक विविधतेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर, हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या विधानाच्या परिणामस्वरूप, आगामी निवडणुकांमध्ये भाषिक मुद्दे केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.





