Pune News : वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी हिंमत जाधव; बदलून आलेल्या उपायुक्तांना नवीन जबाबदाऱ्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलात नव्याने बदलून आलेल्या पोलीस उपायुक्तांना अंतर्गत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर, सध्या आयुक्तालयात कार्यरत तीन उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी हिम्मत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
मिलींद मोहिते यांची विशेष शाखा, पुणे शहर येथून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ दोन या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. संदीप भाजीभाकरे यांची विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी भाजीभाकरे मुख्यालयाच्या उपायुक्त पदावर कार्यरत होते. दरम्यान, हिम्मत जाधव यांची परिमंडळ चार येथून वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.
त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथून शहरात बदलून आलेले सोमय मुंडे यांची परिमंडळ चार येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सिंधुदुर्ग येथून बदलून आलेले कृषिकेश रावले यांची परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून आणि रा.रा. पोलीस बल समादेशक दौंड येथून बदलून आलेल्या राजलक्ष्मी शिवणकर यांची मुख्यालय उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच सहा पोलीस उपायुक्तांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

