Himanta Biswa Sarma : समान नागरी कायदा देशभर लागू करा; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून कायद्याचे समर्थन
आसाममध्ये समान नागरी कायदा (युसीसी) अधिसूचित करण्यात आला असून, तो संपूर्ण देशात लागू केला पाहिजे, असे समर्थन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केले.

Himanta Biswa Sarma : आसाममध्ये समान नागरी कायदा (युसीसी) अधिसूचित करण्यात आला असून, तो संपूर्ण देशात लागू केला पाहिजे, असे समर्थन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केले. समान नागरी कायद्याच्या अभावामुळे मुस्लिम महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, असा दावा त्यांनी केला. बहुपत्नीत्वासारख्या समस्यांवर उपाय करण्यासाठी देशात एकच समान कायदा असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना सरमा यांनी ही भूमिका मांडली. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस हरीश द्विवेदी यांच्या तेलियाजोत गावातील निवासस्थानी त्यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आले होते.
तसेच ‘अँटी-एसआयआर’ आंदोलन आणि सत्तांतराच्या मागणीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपवर केलेल्या टीकेलाही सरमा यांनी प्रत्युत्तर दिले. सत्ता मतांच्या माध्यमातून मिळते, बळाचा वापर करून किंवा दबाव टाकून नाही, असे ते म्हणाले.
सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी बांगलादेश आणि नेपाळमधील घडामोडींचा संदर्भ देत, धमकावून सरकार बदलता येईल असे मानणाऱ्यांनी या देशांकडे पाहावे, असे विधान केले. दिल्लीतील निदर्शनांमध्ये केवळ पाच ते दहा हजार लोक सहभागी झाल्याचाही त्यांनी दावा केला.
कोलकात्यातील दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल सरमा यांनी दुःख व्यक्त केले. सरकारने घटनेची तातडीने दखल घेऊन जखमींच्या उपचारांची व्यवस्था केली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी (Himanta Biswa Sarma) सांगितले.





