झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आसमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हेमंत सोरेन सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका जनसभेत बोलताना त्यांनी आरोप केला की, ‘झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेस हिंदू मतदारांना जातीय आधारावर विभागून, एका विशिष्ट समुदायाचे 100% मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.’ सरमा पुढे म्हणाले, “झारखंडमध्ये सध्या जे घडत आहे, ते असेच सुरू राहिले तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या 50% पर्यंत कमी होईल आणि घुसखोरांची संख्या तितकीच वाढेल. ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे. त्यामुळे घुसखोरांना बाहेर काढणे अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले, “आसममध्ये काहींनी म्हटले की, आम्ही मदरसे बंद करू शकत नाही. मी उत्तर दिले की, भारताला मुल्लांची गरज नाही, डॉक्टर आणि इंजिनियरांची गरज आहे. त्यांनी हल्ला करण्याची धमकी दिली, मी म्हणालो, ‘बेटा, एकदा हल्ला करून दाखवा, मग मी पाहतो.’ मदरसे बंद झाले, काही हल्ला-गुल्ला झाला नाही. राम मंदिराच्या वेळीही असेच म्हणत होते, पण काहीच घडले नाही. जेव्हा हिंदू एकत्र येतात, तेव्हा काहीही हल्ला होत नाही.” आपल्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करताना सरमा म्हणाले, “काही दिवसांपूर्वी मी पाहिले की, झारखंडमध्ये एका मातेजवळ हेमंत सोरेन यांच्या फोटो असलेली पिशवी होती. मी विचारले, ‘तुम्ही JMM ला मत द्याल का?’ त्यांनी उत्तर दिले, ‘बेटा, पिशवी हेमंत सोरेन यांची आहे, पण आतले तांदूळ मोदीजींनी दिले आहेत.’” INDIA आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी आणि असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानांवर विरोधी INDIA आघाडीने आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून सरमा यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. रांचीमध्ये झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी रवी कुमार यांची भेट घेऊन, सरमा यांच्या कथित भडकाऊ आणि विभाजनकारी भाषणांविरोधात तक्रार नोंदवली आहे.