आळंदीत हिमालयीन ध्यान शिबिर: शिवकृपानंद स्वामींच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध

आळंदी – येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिर (१० ते १२ एप्रिल २०२५) दुसऱ्या दिवशी भाविकांच्या उत्साहाने गजबजले होते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी परिसरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मुंबई मराठा फ्रुट वाला धर्मशाळा मैदानातील गुरुतत्त्व प्रदर्शनीला भेट दिली. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या प्रवचन आणि ध्यान कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घेतला.
या प्रसंगी देहू देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम म. मोरे, वेस्ट बंगाल पोलिसांचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल अजय रानडे, अपर आयुक्त गोपीचंद कदम, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, तहसीलदार निलेश जाधव, राणा सूर्यवंशी, सुसाने वेबनार (जर्मनी) आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्री शिवकृपानंद स्वामीजींनी सांगितले की, भारतीय संस्कृतीत गुरूंना परब्रह्माचे स्थान आहे आणि परमात्मा आजही गुरूरूपाने समाजात कार्यरत आहे. त्यांनी ध्यानाद्वारे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली विश्वधर्म आणि आत्मधर्माची संकल्पना साकार होऊ शकते, असे प्रतिपादन केले. आळंदीचे वातावरण हिमालयासारखे चैतन्यमय झाले होते.





