Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचे आतापर्यंत ३१ बळी तर, ४ जण बेपत्ता

Himachal Rain : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २० जून रोजी मान्सून आल्यापासून २७ जूनपर्यंत हिमाचलमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण बेपत्ता आहेत, तर ६६ जण जखमी आहेत. यामध्ये साप चावणे, बुडणे, रस्ते अपघात याशिवाय पाण्यात वाहून गेलेल्या लोकांचे आकडे समाविष्ट आहेत.
मुसळधार पावसामुळे राज्यात एका आठवड्यात २९.१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक २ कोटी ७४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ६ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत तर ८ घरांचे नुकसान झाले आहे. ७ दुकाने आणि ८ गोशाळाही पाण्याने वाहून गेल्या आहेत. ज्यामध्ये ३७ प्राणी आणि पक्षीही वाहून गेले आहेत.
राज्यभरातील ५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यासोबतच, १३५ वीज ट्रान्सफॉर्मर आणि १४७ पिण्याच्या पाण्याच्या योजना तुटल्याने हजारो लोकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान कुल्लू जिल्ह्यात झाले आहे, जिथे २३ रस्ते बंद आहेत.
हवामान विभागाने ३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. विशेषतः २९ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा इशारा देण्यात आला आहे आणि लोकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.





