Himachal Pradesh: भूस्खलनामुळे सफरचंदाची वाहतूक करणारे ट्रक अडकले, वाहतूक ठप्प

रामपूर/शिमला – चौरा येथे हिंदुस्थान-तिबेट मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग 5) भूस्खलनामुळे किन्नौरचा आदिवासी जिल्हा राज्याची राजधानी सिमलापासून तुटला आहे. शुक्रवारी रात्री किन्नौर जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराजवळील नैसर्गिक बोगद्याजवळ मोठमोठे दगड आणि इतर ढिगारा रस्त्यावर सरकत खाली आला आणि त्यामुळे पादचाऱ्यांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण झाला.
दोन्ही बाजूची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली. या उंच टेकड्यांमध्ये सफरचंदाच्या बागा आहेत. तेथील हंगाम अद्याप संपलेला नसल्यामुळे दोन्ही बाजूला ट्रकसह मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली आहेत.
येथील दरडी दूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. या आधी याच रस्त्यावर 7 सप्टेंबर रोजी दरडीकोसळल्याने हा महामार्ग ठप्प झाला होता. तेथील रस्ता वाहतुकीला खुला करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी लागला होता.
सध्या कोसळलेली दरड दूर करण्यास किती काळ लागेल याची काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक असलेल्या भागात या रस्त्यावर वारंवार होणारे भूस्खलन स्थानिक लोकांसाठी आणि फळ उत्पादकांसाठी विशेषतः सफरचंद उत्पादकांसाठी त्रासदायक ठरले आहे.
किन्नौर हे उच्च दर्जाच्या रसाळ सफरचंदांसाठी प्रसिद्ध आहे आणि किन्नरच्या खालच्या पट्ट्यातून सफरचंदाची वाहतूक ऑगस्टमध्ये सुरू होते, तर वरच्या भागातील सफरचंद नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत बाजारात येत राहतात.
हवामानाच्या बदलामुळे यंदा सफरचंद उत्पादनात घट झाली आहे. गेल्या वर्षी किन्नौर भागातून 40 ते 42 लाख पेट्या सफरचंदांचे उत्पादन झाले होते. यावर्षी 30 लाख पेट्यांची अपेक्षा आहे.





