हिमाचल प्रदेशात पुरामुळे ८०० कोटींचे नुकसान; ९१ जणांचा मृत्यू, घरांचेही मोठे नुकसान

शिमला – हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. या आपत्तीमुळे झालेले नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे. ढगफुटी आणि पूर यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसातून हिमाचल प्रदेश सावरू शकलेला नाही. मदत आणि बचाव कार्यातही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.
या आपत्तीमुळे हिमाचल प्रदेशात आतापर्यंत ७४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ९१ जणांचा मृत्यू, १३१ जण जखमी, ३४ जण बेपत्ता, २०७ रस्ते बंद, १३२ ट्रान्सफॉर्मर काम करणे थांबले आहेत, ८१२ पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर परिणाम झाला आहे, २२३८५ प्राणी आणि पक्षी वाहून गेले आहेत, ४३२ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, ९२८ घरांचे नुकसान झाले आहे, ८८० गोशाळा वाहून गेल्या आहेत.
दरम्यान, पाउस अजुनह सुरूच आहे. त्यामुळे मंडीमध्ये मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की सध्या हिमाचल प्रदेशात पाउस सुरूच राहील. या काळात राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१२ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
हवामान केंद्र शिमलाने ११ आणि १२ जुलै रोजी राज्यातील मंडी, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. १३ ते १६ जुलै दरम्यान राज्यातील सुमारे ९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते १६ जुलै दरम्यान राज्यातील उना, हमीरपूर, बिलासपूर, कुल्लू, कांगडा, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.





