Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! 150 बळी अन् शेकडो कोटींचे नुकसान
Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे १५० जणांचा मृत्यू झाला असून ८३४ कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. १९० रस्ते बंद असून प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात मान्सूनचा हाहाकार सुरूच आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात प्रचंड वित्तहानी व जीवितहानी झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या अहवालानुसार, ३० जून ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान मान्सूनशी संबंधित घटनांमध्ये १५० जणांचा मृत्यू झाला असून २२६ जण जखमी झाले आहेत. तर २ जण अद्याप बेपत्ता आहेत.
या नैसर्गिक आपत्तीमुळे हिमाचल प्रदेशचे आतापर्यंत ८३४ कोटी ६७ लाख रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. यात कांगडा, चंबा, शिमला आणि मंडी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अहवालानुसार, या आपत्तींमध्ये १९७ गुरांचा मृत्यू झाला आहे. २२ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून ४१ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. याशिवाय कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.
राज्यात भूस्खलन, दगड व झाडे कोसळणे, पाण्यात बुडणे आणि रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यापूर्वी प्री-मानसून काळातही ६५ जणांचा मृत्यू झाला होता, तर रस्ते अपघातात स्वतंत्रपणे ७८ जणांना जीव गमवावा लागला होता. आपत्ती व्यवस्थापनाच्या ८ ऑगस्ट दुपारी १ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, राज्यातील १९० रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहेत. रस्ते बंद असल्याने अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीम रस्ते पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.





