George Soros And Hillary Clinton : हिलरी क्लिंटन,जॉर्ज सोरोस यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन, वादग्रस्त गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि अभिनेते डेन्झल वॉशिंग्टन यांना मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्ते आज प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करून गौरवण्यात आले. अमेरिकेची समृद्धी, मूल्ये, सुरक्षेसह जागतिक शांतता किंवा इतर महत्वाच्या सामाजिक, सार्वजनिक किंव खासगी क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने गौरवण्यात येते.
अमेरिकेत प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च मन्मान मानण्यात येतो. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला उपस्थित राहू शकला नाही. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, त्यांच्या तत्कालिन मंत्रिमंडळातील माजी संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन आणि इतर अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये संरक्षक जेन गुडॉल, दीर्घकाळ व्होग मॅगझिनचे मुख्य संपादक ऍना विंटूर; अमेरिकन फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन; अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक जॉर्ज स्टीव्हन्स जूनियर; उद्योजक आणि एलजीबीटीक्यू प्लस चळवळीचे कार्यकर्ते टिम गिल; शास्त्रज्ञ बिल नाय आणि कार्लाइल ग्रुप ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्मचे सह-संस्थापक डेव्हिड रुबेन्स्टीन यांचा समावेश आहे.
याशिवाय स्पॅनिश-अमेरिकन शेफ जोस आंद्रेस, आयरिश गायक-गीतकार आणि कार्यकर्ता बोनो, कॅनेडियन-अमेरिकन कार्यकर्ता आणि निवृत्त अभिनेता मायकेल जे फॉक्स आणि दिग्गज निवृत्त बास्केटबॉल खेळाडू जॉन इयरर्सन यांचा देखील पुरस्कारविजेत्यांमध्ये समावेश होता.





