Pune : परदेशात उच्च शिक्षण; शिष्यवृत्ती मंजूर

पुणे : राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यात येतो. आता, आठ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. २०१८-१९ पासून शासन निर्णयान्वये परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची संख्या ७५ विद्यार्थी इतकी निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता परदेशी शिष्यवृती योजनेतंर्गत पात्र ७५ विद्यार्थ्यांची शासन निर्णयान्वये अंतिम निवड करण्यात आली होती.
अंतिम निवड करण्यात आलेल्या ७५ विद्यार्थ्यांपैकी गृहचौकशी अंती अपात्र ठरलेल्या, स्वतः शिष्यवृत्ती नाकारलेल्या, केंद्रीय परदेशी शिष्यूवत्तीचा लाभ मिळालेले असे एकूण ८ विद्यार्थी निवड यादीतून वगळून त्याजागी प्रतिक्षा यादीमधील अन्य ८ विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव तथा निवड समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती.
या निवड समितीच्या बैठकीत प्रतिक्षा यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाची तपासणी करून कला शाखेतील २ तसेच व्यवस्थापन शाखेतील ६ अशा एकुण पात्र ८ विद्यार्थ्यांची गुणवत्ता क्रमवारीनुसार निवड करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या ८ विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच, इतर कागदपत्रांची व तत्सम बाबींची पडताळणी संचालक यांच्याकडून करण्यात येणाऱ्या गृह चौकशीच्या अटीच्या अधिन राहून करण्यात येत आहे. सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून निवड केलेले विद्यार्थी अंतिम निवडीस पात्र राहतील.





