पुणे | उच्चांकी भाव अन् डाळिंब लालीलाल…

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डात डाळिंबाला हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे. घाऊक बाजारात किलोला तब्बल ५०१ रुपये भाव मिळाला. नगर जिल्ह्यातील शेतकरी अक्षय संजय कराळे यांच्या डाळींबास आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व डाळिंबाचे व्यापारी युवराज काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारीया पेढीवर हा भाव मिळाला.
या हंगामातील उच्चांकी भाव मिळाल्यामुळे कराळे यांचा बाजार समितीच्या फळे-भाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्यापाऱ्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
डाळिंबाचा हंगाम सुरू आहे. जानेवारीपर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ३० ते ५० टनपर्यंत आवक होत आहे. जिल्ह्यासह संपूर्ण विभागासह राज्यातील इतर भागातून येथील बाजारात डाळिंबाची आवक होत आहे.
यंदा डाळींबाचे भाव उंच आहेत. घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार १०० ते ४०० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे डाळिंबाला जपण्यासाठी कसरत करावी लागली. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कराळे यांनी येथे माल विक्रीस आणला होता. माल दर्जेदार असल्याने लिलावात त्याला जास्त भाव मिळाला.
मार्केट यार्डात नाशिक जिल्हातील शेतकऱ्याने डाळींब विक्रीस आणली होती. त्या डाळिंबाला घाऊक बाजारात लिलावात किलोला तब्बल ५०१ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. – युवराज काची, व्यापारी मार्केट यार्ड


