रांजणगाव जमीन गैर व्यवहार प्रकरणातील अपील हाय कोर्टाने फेटाळले

शिरूर : रांजणगाव गणपती येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची बहात्तर गुंठे जमीन हडपल्याचा आरोप करत तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने महसूल मंत्र्यांकडे धाव घेतली असता सदर जागेवर सरकार नाव टाकण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. या आदेशाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचूदकर यांचे सासरे आनंदराव दिनकर पाचूदकर यांनी हायकोर्टात अपील केले होते. हायकोर्ट मुंबई यांनी दि. १९.३.२५ रोजी आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे अपिल फेटाळले असल्याची माहिती सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचूदकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तसेच सन २००८ ते २००९ पासून या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी व पदाधिकारी कर्मचारी दोषी ठरविले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचूदकर यांनी केली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे ७२ गुंठे जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला होता व या जमिनीवरील आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे नाव काढून टाकून राज्य सरकारचे नाव दाखल करण्याचे आदेश तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते.
सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ७२ गुंठे जागेची किंमत कोट्यावधी रुपये होत असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडील सन १९६०- ६१ चे रेकॉर्ड भिजल्याचा गैरफायदा उठवीत राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांनी बनावट रेकॉर्ड बनवून ८अ मध्ये खाडाखोड व पाने चिकटाऊन आनंदराव पाचुंदकर यांचे वय १२ वर्ष असतानाही गावठाणातील सुमारे ७२ गुंठे मिळकतीवर सिटी सर्वे मार्फत आनंदराव पाचुंदकर यांचे नाव नोंदविले. याच काळात दत्तात्रय पाचुंदकर यांच्या पत्नी स्वाती पाचुंदकर या साडेतीन वर्षे सरपंच, तर नंतर जिल्हा परिषद सदस्यही होत्या.
दरम्यान २०१९ ला ग्रामपंचायतीची सत्ता आमच्या ताब्यात आल्यानंतर गाव नमुना आठमध्ये खाडाखोड करून केलेला जमीन बळकविण्याचा प्रकार आमच्या लक्षात आला. महाराष्ट्र शासनाची ही जमीन वाचविण्यासाठी आम्ही तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचा पाठपुरावा केला. महसूल मंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी संबंधित मिळकतीतून आनंदराव पाचुंदकर यांचे नाव वगळून शासनाचे नाव दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशा विरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी दाद मागण्यासाठी हायकोर्टात अपील केले असता त्यांचे अपील कोर्टाने दि. १९.३.२५ रोजी फेटाळले असल्याची माहिती सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य अशोक शेळके, निलेश लांडे, अनिल दुंडे, नेताजी फंड, भानुदास शेळके आदी उपस्थित होते. या बाबत राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता दत्तात्रय पाचुंदकर यांनी भेट टाळली.





