महिला स्वच्छतागृहात “छुपा कॅमेरा’

हिंजवडीतील “बी हाईव्ह’ रेस्टॉरंटमधील प्रकार
कर्मचाऱ्याने कॅमेरा ऑन करून लपविला होता मोबाइल
पिंपरी – हिंजवडीतील बी हाईव्ह रेस्टॉरंटमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावण्यात आला होता. एका महिलेच्या दक्षतेमुळे स्वच्छतागृहात लावलेला छुपा कॅमेरा उघडकीस आला. ही घटना हिंजवडीतील “बी हाईव्ह’ रेस्टॉरंट येथे रविवारी (दि. 3) रात्री घडली. या प्रकरणी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम देब नाथ (वय 24, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत “बी हाईव्ह’ रेस्टॉरंटचे व्यवस्थापक राकेश शेट्टी (वय 35, रा. इंगळे कॉर्नर, कर्वेनगर, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 5) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम देब नाथ हा हिंजवडी फेज वन येथील “बी हाईव्ह’ रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे. त्याने महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाइलचा कॅमेरा ऑन करून लपविला. रविवारी रात्री ही बाब एका महिला ग्राहकाच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब हॉटेल व्यवस्थापकास सांगितली.
हॉटेल व्यवस्थापकाने रविवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी तब्बल दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने यापूर्वी आणखी महिलांचे अशा प्रकारे लपून चित्रीकरण करण्यात आले आहे काय, याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे करीत आहेत.





