Hero MotoCorpला मोठा नफा, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश देण्याची घोषणा

Hero MotoCorp Dividend Announcement: दुचाकी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Hero MotoCorp ने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 51 टक्क्यांनी वाढून 1073.4 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने शुक्रवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. मोठ्या नफ्यामुळे कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. तज्ज्ञांनीही कंपनीला चांगला नफा मिळण्याची शक्यता वर्तवली होती.
कंपनीचा महसूल वाढला –
Hero Moto Corp ने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत त्यांचा महसूल 9723.7 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 8031 कोटी रुपये होता. कंपनीचे EBITDA मार्जिन देखील वार्षिक आधारावर 250 बेसिस पॉइंट्सने वाढून 14 टक्के झाले आहे.
सणासुदीच्या काळात विक्रमी विक्री –
सणासुदीच्या काळात कंपनीची विक्री आतापर्यंतची सर्वाधिक आहे. 32 दिवसांत कंपनीने 14 लाख दुचाकींची विक्री केली आहे. कंपनीने सांगितले की, बोर्डाने 100 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. यापैकी 75 रुपये अंतरिम लाभांश आणि 25 रुपये विशेष लाभांश असेल. शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी, हिरो मोटो कॉर्पचे शेअर्स BSE वर 2.10 टक्क्यांनी वाढून 4,908.5 रुपयांवर बंद झाले.





