नांदेडः ‘आपल्याला आपल्या तीन पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांची नावे कदाचित ठाऊक नसतील, मात्र २०० वर्षांनंतरही महात्मा फुले यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आकर्षण वाटते. हे नातं केवळ जैविक नसून ते विचारांचे आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि आयआयबी यांच्या विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात ‘महात्मा फुले’ या विषयावर कुलकर्णी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी शिक्षण, शेती, उद्योग आणि भारतीय परंपरेची चिकित्सा अशा सर्वच क्षेत्रांत मूलभूत कार्य केले आहे. ते केवळ विचारवंतच नव्हे तर प्रयोगशील शेतकरी आणि उद्योजकही होते. आज बहुजन समाजातील सुशिक्षित मध्यमवर्ग स्वतःच्या मुळांपासून तुटून पुन्हा कर्मकांडांच्या आहारी जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे चक्र तोडण्यासाठी सुशिक्षितांनी आपल्या भौतिक आकांक्षांना मर्यादा घालून समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. फुले यांच्या द्विशताब्दी वर्षात सुशिक्षित वर्गातील विद्रोही भान पुन्हा जागृत करणे, हाच खरा आजचा प्रश्न आहे. जर आपण हे करू शकलो नाही, तर वाढती धनशक्ती आणि जातीय वास्तव वंचितांचे जगणे अधिक कठीण करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हेरंब कुलकर्णी यांचे स्वागत ‘मसाप’ चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देवीदास फुलारी आणि आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहकार्यवाह राम तरटे यांनी केले, तर आभार कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांनी मानले. या व्याख्यानाला माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, प्रा बालाजी कोंपलवार, निळकंठ पाचंगे, दिगू तुमवाड, दिलीप शिंदे, विलास ढवळे, शिवा कांबळे, सुरेश दंडवते, अंकुश खानसोळे, गोविंद मुंडकर, रवींद्र पांडागळे, उमेश पांचाळ, मिलिंद जाधव, मनोहर बसवंते, सुनील मुत्तेपवार, यांच्यासह शहरातील नागरिक आणि विचारवंत उपस्थित होते. महात्मा फुले यांचे विचार गावा-गावात पोहचविण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अफाट कार्याची माहिती गावागावात पोहचविण्यासाठी राज्यभर दोन हजार व्याख्यान देण्यासाठी सध्या हेरंब कुलकर्णी हे गावोगाव फिरत आहेत. पाठ्यपुस्तकात फुलेविषयी मजकूर कमी होत गेल्याने व मध्ये बराच काळ फुलेविषयी तपशीलवार माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून त्यांनी ६८ पानांची पिडिएफ बनवली आहे. त्यासाठी ३ महिने त्यांनी वाचन केले. यात फुलेंचे चरित्र, त्यांचे महिला प्रश्नावर, शिक्षणावर विचार, विधवांसाठी केलेले काम, पुरोहितशाही, धार्मिक कर्मकांड यावर फुलेंचे विश्लेषण, शेतीविषयक चिंतन त्यावर केलेले काम, फुलेंनी लिहिलेल्या पुस्तकांचा परिचय असे सविस्तर तपशील त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर आजचे शिक्षणाचे प्रश्न, आजचे शेतीचे प्रश्न, आजचे पुरोहितशाही आव्हान आज एकल महिलांचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न याविषयी सुद्धा मुद्दे दिले आहेत. इतरांनी ती पीडीएफ वाचून किमान ५ व्याख्याने द्यावीत, असे आवाहन देखील हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे. मराठवाडा अग्रेसर कुलकर्णी पुढे म्हणाले की, देशातील सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असून, त्यापैकी १७ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. विशेष म्हणजे या १७ जिल्ह्यांपैकी संपूर्ण भारतात मराठवाडा कोणत्या क्षेत्रात अग्रेसर आहे हे ठामपणे सांगता येणार नाही; मात्र बालविवाहाच्या बाबतीत मराठवाडा देशात अव्वल स्थानी असल्याचे कुलकर्णी म्हणाले.