‘झामुमो’चा ‘यु-टर्न’: बिहार विधानसभा निवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय!

पाटणा: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. यापूर्वी बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, आता झामुमोने ही निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जागा वाटपावरून तिढा कायम –
बिहारमधील जागा वाटपावरून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेससोबतचा तिढा कायम राहिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. झामुमोने राजद आणि काँग्रेसवर ‘राजकीय कट’ रचल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे झारखंडच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोनच दिवसांपूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा –
सोरेन यांच्या पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर लढणार असल्याची आणि सहा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा ‘यु-टर्न’ घेतला आहे. जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्याने झामुमोने शनिवारी (१८ ऑक्टोबर २०२५) चकाई, धमदाहा, कटोरिया, मनिहारी, जमुई आणि पीरपैंती या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
Hemant Soren-led JMM says it won’t contest Bihar polls after announcing that it will fight independently
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2025
‘राजकीय कटा’चा आरोप
झारखंडचे पर्यटन मंत्री कुमार यांनी राजद आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. “राजद आणि काँग्रेस एका राजकीय कटातून झामुमोला निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्यासाठी जबाबदार आहेत,” असे ते म्हणाले. झामुमो याला ‘जशास तसे उत्तर देईल’ आणि राजद व काँग्रेससोबतच्या आपल्या आघाडीचा ‘पुनर्विचार’ करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सहा जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज, सोमवार (२० ऑक्टोबर २०२५) होती.
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान –
बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबरला घोषित होतील.





