Hema malini : त्या काळात आम्हाला खूप छळलं.! सनी देओलच्या रागाबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या….

Hema malini | Sunny deol | Paparazzi | Dharmendra – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, या कठीण काळात पापाराझींच्या (फोटोग्राफर्स) वागणुकीमुळे देओल कुटुंब खूपच संतप्त झाले होते.
विशेषतः सनी देओल आणि पापाराझींमधील वादावर सर्वांनीच पाहिला होता. याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान, आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय घडला होता नेमका प्रकार?
धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णालयाबाहेर पापाराझींनी मोठा गराडा घातला होता. कौटुंबिक प्रायव्हसी जपण्यासाठी देओल कुटुंबीयांनी त्यांना घरी हलवून तिथेच उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथेही पापाराझींचा वावर कमी झाला नाही.
View this post on Instagram
तसेच, धर्मेंद्र यांचा रुग्णालयातील एक अत्यंत खंगलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपल्या वडिलांची ही अवस्था सार्वजनिक झाल्याने सनी देओलचा पारा चढला. त्याने घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना “तुम्हाला लाज वाटत नाही का?” अशा शब्दांत खडसावत आपला संताप व्यक्त केला होता.
हेमा मालिनी यांनी काय म्हटले?
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “धर्मेंद्रजींच्या जाण्याने आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. जवळपास महिनाभर आम्ही सर्वजण त्यांच्या प्रकृतीसाठी संघर्ष करत होतो.
मी, ईशा, बॉबी आणि सनी… आम्ही सर्वजण रुग्णालयात त्यांच्यासोबत होतो. याआधीही अनेकदा त्यांची प्रकृती बिघडली होती, पण दरवेळी ते मृत्यूवर मात करून घरी परतले होते. यावेळीही ते जिद्दीने परत येतील, अशी आम्हाला आशा होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.”
त्या पुढे म्हणल्या, ‘वडिलांच्या आजारपणात त्यांच्या खाजगी फोटोंचा गैरवापर झाल्याने सनी देओल भडकला होता. तो नाराज होता आणि त्याला प्रचंड राग येत होता. कारण त्यावेळी आम्ही सर्वजण अत्यंत भावनिक टप्प्यातून जात होतो.
त्या अवस्थेतही मीडिया आणि पापाराझी सतत आमचा आणि आमच्या गाड्यांचा पाठलाग करत होती. त्या काळात आम्हाला खूप छळलं गेलं होतं.” असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.





