लसीकरण केंद्रांवर आता मदतकक्ष

महापालिका घेणार स्वयंसेवी संस्थांची मदत
पुणे – ज्येष्ठ नागरिक आणि अन्य आजार असलेल्या व्यक्तींना करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, अनेकांना नोंदणीपासून केंद्रावर गेल्यानंतर अनेक अडचणी येत आहेत. शिवाय लसीकरणानंतर या व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय लसीकरण केंद्रांवर महापालिका प्रशासन मदत कक्ष सुरू करणार आहे.
या कामासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. त्यासाठी या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधिंशी चर्चा केली असून, पुढील आठ दिवसात हे कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये नागरिक आणि फ्रंटलाइन वर्कर्सची लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन कोलमडत आहे. त्यामुळे लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी ही मदत घेतली जाणार आहे.
असे असेल मदतनिसांचे काम
लसीकरणासाठी आलेल्यांची जनजागृती. लसीकरण नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे आवश्यक, लसीकरण कसे होईल. याची माहिती दिली जाईल. गर्दीचे व्यवस्थापन करून त्यांच्या शंकांचे निरासन केले जाईल. लस घेतलेल्यांना हे मदतनीस दैनंदिन संपर्क करून त्यांना काही त्रास आहे का? वेगळी काही लक्षणे आहेत का, याची माहिती घेतील.
पहिली लस दिल्यानंतर संबंधित नागरिकांना दुसऱ्या लसीकरणाच्या काही दिवस आधी लसीकरणाची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरासन करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांकडे असेल.





