कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; ‘या’ महिला मंत्र्याने दिला अजब सल्ला

नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आला असताना, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये जोरदार सभेतून भाजपच्या प्रचाराला गती दिली. नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी असून, याच पवित्र भूमीत देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) यांच्या हातात कमळआहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
नाशिक आणि कुंभमेळ्याचा विकासाचा संदर्भ
पंकजा मुंडे म्हणाल्या, “नाशिक ही रामाची आणि हनुमानाची जन्मभूमी आहे. येथे येणारा कुंभमेळा हा फक्त धार्मिक सोहळा नाही, तर नाशिकच्या विकासाचा पाया आहे. कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक येतात, त्यामुळे महापालिकेवर प्रचंड ताण येणार आहे. त्यासाठी सक्षम, मजबूत आणि विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक आहे. म्हणूनच महापौरही भाजपचाच असला पाहिजे.”
त्यांनी मागील सिंहस्थ कुंभमेळ्याचा उल्लेख करताना सांगितले, “मागील सिंहस्थ कुंभाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पालकमंत्री होते. त्यावेळी नाशिकने जगभरात आपली ओळख निर्माण केली. आता पुन्हा असाच विकास होण्यासाठी भाजपचेच नेतृत्व हवे.”
विरोधकांवर टीका
पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लक्ष्य करताना म्हटले, “श्रीरामाच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे. नाशिकचे नाव शूर्पणखेचे नाक कापल्यावरून पडले. जे विकासाच्या आड येतात, असे विरोधक आम्ही छाटणार आहोत.” त्यांनी पुढे जोर दिला, “आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले आहेत, तर महापौर का नको? हे सगळे एकत्र आले तर नाशिकचा विकास कोण थांबवू शकणार?”
‘लाडक्या बहिणीं’ना खास आवाहन
महिलांना आवाहन करताना पंकजा मुंडे यांनी भावनिक पद्धतीने म्हटले, “लाडक्या बहिणींनो, १५ जानेवारी रोजी सकाळी लवकर उठा. देवपूजा करा, नाश्ता करा, झाकून ठेवा. आधी कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा. कमळाला आशीर्वाद द्या, कारण कमळच नाशिकला नवी उंची देऊ शकते.” त्यांनी सांगितले की, अजून काही सभा राहिल्या आहेत आणि सर्वांनी १५ जानेवारी रोजी मतदान करून भाजपला आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.





