शिवसेनेकडून इर्शाळवाडीसाठी मदत; महिनाभर पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य रवाना

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहर शिवसेनेच्या वतीने इर्शाळवाडी येथे मदतकार्य म्हणून 1 महिना पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य (किराणा) शनिवारी सकाळी रवाना करण्यात आली. यात जीवनावश्यक वस्तूंसह वैद्यकीय साहित्य, औषधे, कपडे, पांघरूण, रेनकोट, स्वेटर तसेच इतर साहित्याचा समावेश असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली.
खोपोली जवळील इर्शाळवाडी येथे बुधवारी मध्यरात्री गावावर दरड कोसळली असून त्यात अनेक जण अडकले आहेत. या ठिकाणी त्या दिवशी रात्रीच बचावकार्य सुरू झाले असले तरी या भागात अद्यापही पाऊस तसेच धुक्यामुळे तसेच गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. अशा स्थितीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर पावसात घटनास्थळी जाऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर, त्यांनी स्थानिकांची भेट घेऊन शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासनही दिले होते.
याच पार्श्वभूमीवर शहर शिवसेना प्रमुख भानगिरे यांच्या वतीने स्थानिकांसाठी 1 महिना पुरेल एवढे अन्नधान्य तसेच वैद्यकीय साहित्य, औषधे, कपडे, पांघरूण, रेनकोट, स्वेटर पाठविण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांची टीम पुणे ही हे साहित्य घेऊन शनिवारी सकाळी इर्शाळवाडीकडे पाठविण्यात आली असून त्याचे वाटपही सुरू करण्यात आले आहे.





