पुणे | शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

पुणे,{ प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहर-जिल्हा तसेच पुणे विभागातील सर्वच जिल्ह्यांमधील सर्व शासकीय आणि निमशासकीय तसेच मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्तीचा अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
वाहनचालकाने स्वत: आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
राज्यात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांच्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते, अशी सूचना माजी न्यायमूर्ती तथा सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष अभय सप्रे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर हे आदेश बजावण्यात आले आहेत
सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे १८ आॅक्टोबर रोजी रस्ते अपघात व पर्यायाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक झाली.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे, अशा सूचना न्या. सप्रे यांनी नुकत्याच केल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त यांनी हे आदेश सोमवारी (दि.21) जारी केले आहेत.
शिस्तभंग करणाऱ्यांना दंड तसेच सेवापुस्तकात नोंद करणार
कायदेशीर आदेशांचे पालन करण्यास किंवा अधिकारी/कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई संबंधित कार्यालय प्रमुख यांनी कारवाई करायची आहे.
तसेच कुचराई करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यामार्फत दंड व मूळ सेवापुस्तकात नोंदही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

