Heinrich Klaasen : ‘२०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळायचे होते पण…’, हेनरिक क्लासेनने निवृत्तीबद्दल केला मोठा खुलासा

Heinrich Klaasen Retirement Reason Revealed : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून टाकले. जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा त्यामागील कारण कोणालाही माहिती नव्हते. पण आता क्लासेनने स्वतःच वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली याचा खुलासा केला आहे.
हेनरिक क्लासेनने सांगितले निवृत्तीचे कारण –
हेनरिक क्लासेन सांगितले की, त्याला त्यांच्या देशासाठी क्रिकेट खेळण्याबरोबरच जगभरातील प्रमुख टी-२० लीगमध्येही सहभागी व्हायचे होते. मात्र, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) सोबत करार होऊ न शकल्याने आणि प्रशिक्षकपदातील बदलांमुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. क्लासेनला २०२७ च्या क्रिकेट विश्वचषकापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी खेळायचे होते. परंतु, रॉब वाल्टर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आल्यानंतर आणि व्हाइट-बॉल संघासाठी शुकरी कोनराड यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने क्लासेनच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली.
हेनरिक क्लासेन आणि सीएसएमध्ये ताळमेळ बसला नाही –
रॅपोर्टच्या हवाल्याने हेनरिक क्लासेनने सांगितले की, बराच काळ त्याला असे वाटत होते की त्याच्या कामगिरीचा संघाच्या विजय किंवा पराजयावर फारसा परिणाम होत नाही. अशा वातावरणात राहणे योग्य वाटत नव्हते. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याची प्रशिक्षक रॉब वॉल्टरशी सविस्तर चर्चा झाली. क्लासेनने वॉल्टर यांना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमुळे ते असमाधानी आहेत आणि क्रिकेटचा आनंद घेऊ शकत नाहीत. या दीर्घ चर्चेदरम्यान त्यानी रॉब वॉल्टर यांच्याशी २०२७ मधील विश्वचषकापर्यंतच्या कालावधीसाठी सर्वकाही व्यवस्थित नियोजन करण्याबाबत विचारविनिमय केला.
दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनची कामगिरी
तो पुढे म्हणाली की, जेव्हा रॉबचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आणि सीएसएसोबतचा करार यशस्वी झाला नाही, तेव्हा त्याला हा निर्णय घेणे आणखी सोपे झाले. क्लासेनने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी चार कसोटी, ६० एकदिवसीय आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत १०४ धावा, एकदिवसीय सामन्यात २१४१ धावा आणि टी-२० मध्ये एक हजार धावा केल्या. आता तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळताना दिसेल.





