पिंपरी | लोणावळा शहरात अवजड वाहतूक कायमस्वरुपी बंद

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची आणि अपघातांची समस्या दूर करण्यासाठी लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला कायम स्वरुपी बंदी घालण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे, डॉ. सुहास दिवसे यांनी पारित केली आहे.
त्यामुळे यापुढे सर्व प्रकारचे टेम्पो, ट्रक, ट्रेलर, टँकर यांना या मार्गाने लोणावळा शहरातून प्रवास करता येणार नाही.
लोणावळा शहरातून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग ४ जात असून, लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार तसेच इतर सार्वजनिक सलग सुट्टया असतात, तेव्हा पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात वर्दळ असते.
पुणे-मुंबई व मुंबई- पुणे या मार्गावर जड-अवजड वाहनांना एक्स्प्रेस वे उपलब्ध असतानाही जड, अवजड वाहने शहरातून ये-जा करतात. त्यामुळे लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची व अपघाताची समस्या निर्माण होत असते.
त्यासाठी लोणावळा शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग ४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिटदरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड-अवजड वाहतबक कायम स्वरुपी बंद ठेवावी. तसेच ही वाहतूक पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवरुन सुरु ठेवावी, आणि तशी अधिसूचना काढावी असा प्रस्ताव पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला होता.
कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
लोणावळा शहरात जड-अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असलेची खात्री करून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे, डॉ. सुहास दिवसे यांनी लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेहून वाहतूक सुरु
जुन्या पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिटदरम्यान सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला कायम स्वरुपी बंदी घालण्यात आली.
या कालावधीत सदरची जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन सुरु ठेवण्यात असे आदेश देण्यात आले आहे.





