पुणे – शहर-उपनगरांत सलग तिसऱ्या दिवशी संततधार सुरू होती. त्यामुळे अधून-मधून जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत शहरात पाऊस सुरूच होता. शहरासह धरणक्षेत्रांत पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणेकर सुखावले आहेत. तसेच घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत असून, ताम्हिणी घाटात सर्वाधिक 230 मि.मी. पावसाची नोंद झाली.
अंबवणे येथे 190, शिरगाव येथे 136 तर धावडी येथे 196 मिमी पावसाची नोंद झाली. पुण्यासह जिल्ह्यातील काही भागांत जोरदार सरी पडत आहेत. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस शहरात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
परिसर आणि पाऊस (मिमीमध्ये)
भोर-92, लवासा-26, तळेगाव-15, एनडीए-5, खेड-4, पाषाण-3, शिवाजीनगर-5, राजगुरूनगर आणि वडगावशेरी-1.