पुण्यात जोरदार पावसाचा तडाखा; सणसवाडीत मोठे होर्डिंग कोसळले, पुणे-सातारा रस्त्याला भेगा

पुणे – पुण्यात मंगळवारी (दि. २०) जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. सणसवाडी येथे पुणे-नगर महामार्गावर अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने ७ ते ८ दुचाकींचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी टळली. दुसरीकडे, पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री परिसरात सततच्या पावसामुळे रस्त्याखालची माती खचून मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
हरिश्चंद्री येथे सुरू असलेल्या ओव्हरब्रिजच्या कामामुळे तीनपैकी दोन लेन बंद होत्या. केवळ एकाच लेनवरून वाहतूक सुरू असताना, सततच्या पावसामुळे रस्त्याला मधोमध खोल भेगा पडल्या. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पर्यायी मार्ग दाखवून वाहतूक सुरळीत केली. प्रशासनाने सिमेंटच्या साहाय्याने भेगा भरून काढल्या, परंतु या घटनेने महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुण्यातील विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचले. ड्रेनेज लाइनमधून पाणी बाहेर येत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. सणसवाडी येथील होर्डिंग दुर्घटनेने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने पुणेकरांना झोडपले असून, प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेची देखभाल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





