Satara Rain : मुसळधार पावसाचा तडाखा! हेळवाकमध्ये पूरस्थिती; ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू

कोयनानगर : कोयना धरणातून वाढलेला विसर्ग आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे हेळवाक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यांसह अनेक घरांच्या आवारात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. गावातील काही भाग जलमय झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले असून ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू केली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ८ फुटांवरून ९ फुटापर्यंत उघडून ६५,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
कोयना नदीमध्ये एकूण ६७,७०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.





