Pimpri : पावसाचा तडाखा ! कोथुर्णे पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला; पवना धरणातून ७४१० क्युसेक्स विसर्ग

पवनानगर : पवना धरणातून ७४१० क्युसेक्सने सुरू झालेल्या जोरदार विसर्गामुळे कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला असून, कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगरशी संपर्क पूर्णतः तुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे धरण साठा झपाट्याने वाढला असून, धरण प्रशासनाने सकाळी ९ वाजता हा उच्च विसर्ग सुरू केला आहे.
या भागातील दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी यांना आता शिवली व ब्राम्हणोली मार्गे किंवा कडधे मार्गाने पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहेत. धरण प्रशासनाने सांगितले की, पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोणीही नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने करत जनावरे, पंप यंत्रणा, शेती साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांनी अधिकृत सूचनांनुसारच वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





