पिंपरी | पवन मावळात धो-धो पाऊस, पवना धरण ३३ टक्के भरले
Updated On:

पवनानगर, (वार्ताहर) – मागील काही दिवसांपासून पवन मावळ भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पवना धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवार – रविवार दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यांच्या पार गेला आहे.
सोमवारी सकाळी ६ वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहरासह मावळकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात ३३.२६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होत आहे.
सोमवारी सकाळी ६ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात पवना धरण परिसरात ८१ मी.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून १ जूनपासून ७४३ इतका पाऊस झाला आहे. पवना विभागाचे उपविभाग अभियंता अशोक शेटे यांनी ही महिती दिली.





