नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! नदी नाल्यांना पूर; अनेक गावांना पुराचा वेढा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मागच्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी ह्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आसना नदी परिसरातील वरच्या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड -वसमत राज्य महामार्ग,नांदेड -पूर्णा राष्ट्रीय महामार्ग, किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होऊन रस्त्यांना तळ्याचे रूप आले आहे. दरम्यान नांदेड महापालिकेने मान्सून पूर्व नाले सफाई न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा उडाले आहेत. पहिल्याच पावसात नाले सफाई अभावी शहराची अशी गटार गंगा झाल्याने नांदेड वाघाळा महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
नांदेड जिल्ह्याची तहान भागवणारा एकमेव प्रकल्प दमदार पावसामुळे 80 टक्के भरला आहे. तर जिल्ह्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगाव,अर्धापुर,भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या पुलावरून पाणी जाऊन ते वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूकीचा मात्र खोळंबा झाला आहे.
चिखली, पिंपळगाव, कोंढा, निळा, एकदरा,आलेगाव,देगाव, कासारखेडा, गणपूर, मुदखेड यासह अनेक गावांना पुरामुळे वेढा पडला आहे. तर मुदखेड, नांदेड, अर्धापुर ,उमरी, मुखेड, बिलोली, हदगाव या शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.





