मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक गावं पुराच्या विळख्यात; बळीराजा संकटात…

Maharashtra Rain | मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. पुराच्या पाण्यात अनेक जण अडकले असून लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे.
मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. पुढील संपूर्ण आठवडा पाऊस असाच असणार आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाघोडा गावात जोरदार पाऊस झाला, तर कल्याणमधील वीजप्रकल्प ओव्हरफ्लो झाला. लातूरमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
पुराच्या पाण्यामुळे जनजीवनासोबतच शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. रुग्णालये, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
शाळा महाविद्यालयांना सुट्टी
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व शाळांना व महाविद्यालयांना आजची सुट्टी जाहीर केली आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणार – कृषिमंत्री भरणे
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात दिली आहे. तर मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील आढावा घेतला.
हेही वाचा:
शनैश्वर देवस्थानचे ट्रस्ट बरखास्त; राज्य सरकारचा मोठा निर्णय; काय आहे नेमकं प्रकरण?





