घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे – समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टी समांतर वाऱ्याची द्रोणिका रेषा स्थित आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधूदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) संपूर्ण महाराष्ट्रासह देश व्यापला. मात्र, महाराष्ट्र राज्यातील घाटमाथा परिसर सोडला, तर बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विदर्भातही तुरळक ठिकाणीच पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी पेरण्या झाल्या, तर काही ठिकाणी चांगला पाऊस न झाल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत.
दि. ५ जुलै रोजी राज्यातील कोकण- गोवा आणि विदर्भातील बहुतांश भागात, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यात पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधूदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील.





