राज्यात पावसाचा खेळ ! कुठे मुसळधार तर कुठे उष्णतेचा तडाखा; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Upadte : राज्यात सध्या हवामानाचा खेळ सुरू आहे. काही भागात कडक ऊन आणि उष्णतेचा दाह तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत करत आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, ८ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.
- मुंबई आणि उपनगर : पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू असून, काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. यलो अलर्ट लागू.
- पुणे : पावसाचा जोर कायम असून, यलो अलर्ट अंतर्गत पुढील ३ तासांत मध्यम पावसाचा अंदाज.
- हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बन, बरडा, वझर परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडाला. पहाटे ५ वाजल्यापासून सलग तीन तास पाऊस कोसळत असून, कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. जनजीवन ठप्प झाले आहे.
- नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, सोलापूर, लातूर, बीड : पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
- कोकण किनारपट्टी : सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, मासेमारीवर निर्बंध लागू.
हवामानाचा अंदाज काय?
IMD नुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल, तर विदर्भात हलक्या सरींसह आंशिक ढगाळ वातावरण राहील. इतर भागांत उष्णता आणि दमटपणा कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक हवामान अपडेट्स तपासावेत आणि पूर, वीज कोसळणे यापासून सावध राहावे.





