Maharashtra Weather Update : राज्यात दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. देशभर नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असतानाही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) २१ ऑक्टोबरपासून पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या महिन्यातील पूरप्रवण भागांमध्ये आता पुन्हा पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे, तर नागरिकांसाठी वादळी वारे आणि विजांसह पावसाचा धोका वाढला आहे. IMD ने नेमकं काय सांगितलं? बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम भारतात, विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरपर्यंत वज्रपातासह पावसाची शक्यता आहे. हा पट्टा पश्चिम-उत्तर-पश्चिमेकडे सरकत असल्याने २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ आणि मध्य प्रदेशातही तीव्र पावसाची शक्यता नमूद केली आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात २० ऑक्टोबरला तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस आणखी तीव्र होईल, असा अंदाज आहे. याशिवाय, १६ ऑक्टोबरला पूर्णपणे माघार घेतलेल्या नैऋत्य मोसमी पावसानंतर हा अवकाळी पाऊस असल्याने पूर, वादळ आणि नुकसानीचा धोका वाढला आहे. कुठे कसा पाऊस? IMD ने येलो अलर्ट (मध्यम ते जोरदार पाऊस, सावधगिरी बाळगावी) जारी केला असून, खालील प्रमाणे जिल्ह्यांचा तपशील आहे. वादळी वारे ४०-५० किमी/तास वेगाने धावतील, तर किनारी भागात समुद्री अस्थिरता वाढेल. २१ ऑक्टोबर ” रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली २२ ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव (उमरगाव), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा २३ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली २४ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली २५ ऑक्टोबर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (नागपूर, अमरावती, वर्धा इ.) मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरी भागात हलका ते मध्यम पाऊस असला तरी कोकणातील किनारी जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.