मुंबईत मुसळधार ! ‘हा’ महत्वाचा मार्ग बंद.. मुंबईकरांना करावा लागणार पर्यायी मार्गाचा वापर

मुंबई – मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला कडक ऊन सहन करणाऱ्या मुंबईकरांना या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळाले. यासह पावसामुळे मुख्य रस्त्यांवर काहीशी गर्दी देखील झाली होती. अनेक भागात पाणी साचायला लागल्याने मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचे समजते. या परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर चांगलाच पाणी साचलंय. 24 जून रोजी झालेल्या पावसामुळे अंधेरी येथील सबेवेत पाणी साचून अनेक गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने अंधेरी सबवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंधेरी पूर्व-पश्चिम असा प्रवास करण्यासाठी अंधेरी सबवे वापरला जातो. कारण अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. पण पावसामुळे आता सबवे देखील बंद करण्यात आला आहे. पाण्याचा निचरा होईपर्यंत हा मार्ग खुला केला जाणार नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना जेव्हीएलआर (ट्रॉमा सेंटर), कॅप्टन गोर उड्डानपूल (विलेपार्ले) आणि मिलन सबवे हे पर्यायी मार्ग वापरावे लागणार आहेत.
प्रशासन अलर्टवर
मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी परिसरात भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळी उपाययोजनांचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
काल मुंबईत (२७.०६.२०२३) सकाळी ८ ते आज (२८.०६.२०२३) सकाळी ८ या कालावधीत मुंबई महानगरातील सरासरी पाऊस:
मुंबई शहर- ०७ मिमी.
पूर्व उपनगरे- २८ मिमी.
पश्चिम उपनगरे- २९ मिमी.





