पिंपरी | मावळात मुसळधार सरी, ‘पवना’ने गाठली शंभरी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मावळ तालुक्यात देखील मुसळधार सरी बरसू लागल्या आहेत.
जवळपास दोन आठवडे विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे.
पवनमावळ विभागात पावसाने धडाक्यात पुनरागमन केले असून पवना धरणाने शंभरी गाठली आहे. रविवारी सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार पवना धरणाचे सहाही दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील घाट क्षेत्रात आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर अधिक आहे. यावेळी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा देखील वाहत आहे.
पवना धरणाची शंभरी
मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण शंभरीपर्यंत पोहोचले आहे. परंतु प्रशासनाच्या सुचनेनुसार धरणातून सातत्याने विसर्ग करण्यात येत असून धरणातील जलसाठा नियंत्रित केला जात आहे.
रविवारी सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार धरणात ९९.४२ टक्के पाणीसाठा असून सद्यस्थितीत विद्युतगृह आणि सांडव्यावरून एकूण ३५६० क्युसेक इतका विसर्ग होत आहे.
हा विसर्ग पावसाचा जोर पाहून आणि धरणातील पाण्याची आवक पाहून वाढविला जाईल, असे धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नदीकाठच्या नागरिकांना इशारा
पवना नदीत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नदीची पाणीपातळी वाढली आहे, तसेच विसर्ग वाढविल्यास ती आणखीन वाढेल.
त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती अवजारे, जनावरे तत्काळ सुरक्षितस्थळी हलविण्यात यावीत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. यासह इंद्रायणी नदी काठच्या नागरिकांनाही खबरदार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला
लोणावळा शहर आणि परिसरात शुक्रवार, शनिवार दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी अतिमुसळधार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, शहर परिसरात २४ तासात एकूण १५३ मीमी इतका पाऊस झाला.
तसेच चालू हंगामात एकूण ४७१८ मीमी पाऊस झाला आहे, जो गतवर्षीपेक्षा १२०० मीमी अधिक आहे. लोणावळा शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मावळात सर्वदूर पाऊस
मावळ तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढू लागला आहे. पवनमावळ, लोणावळा विभागासह आंदर मावळ, नाणे मावळ, कामशेत, तळेगाव, वडगाव मावळ या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढू लागला आहे.
पावसाची संततधार सुरूच असल्याने ओढे, नाले, नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, पाण्यात उतरू नये, पावसाचा जोर वाढल्यास गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.





