तैपेई, (तैवान) : चीनच्या उत्तरेकडील भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ४ जण बेपत्ता झाले आहेत. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील उरड रिअर बान्नेर या डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली. निसर्गरम्य ठिकाण म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी १३ जण या पुरात बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्यांपैकी रविवार सकाळपर्यंत एकाला वाचवण्यात यश आले असून ८ जणांचे मृतदेह सापडले आहेत, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. बेपत्ता झालेल् इतर व्यक्तींच्या शोधासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला वायव्य गांसु प्रांतात आलेल्या पुरात किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण बेपत्ता झाले. देशाच्या इतर भागातही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, तर हाँगकाँगमध्ये ऐतिहासिक मुसळधार पाऊस पडला आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा पाकिस्तानमध्ये देशभरात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशात अतिवृष्टीमुळे देशाच्या उत्तर भागातील मरण पावणाऱ्यांची संख्या वाढून ३२७ इतकी झाली आहे. जून महिन्यापासून पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीचे थैमान सुरू आहे. दिनांक २६ जूनपासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये ६५० लोकांचा मृत्यू झाला आहे. घरे कोसळल्याने आणि पाण्याच्या प्रवाहात रहिवासी, पशुधन आणि वाहने वाहून गेल्याने किमान १३७ लोक जखमी झाले. दिनांक १७ ऑगस्टपासून २१ ऑगस्टपर्यंत देशभरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पंधरवड्यात दरवर्षापेक्षा खूप जास्त पाऊस होण्याचा अंदाज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनेही वर्तवला आहे.