PUNE : प्लॅटफॉर्मवर प्रचंड धुराळा आणि खडतर प्रवास…

पुणे – प्लॅटफॉर्म उखडून ठेवल्यामुळे नीट चालता येईल, कामाच्या धुराळ्याने सगळे कपडे खराब होतात. ही परिस्थिती आहे, पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरील. संथ गतीने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी, प्रवाशी गर्दी कमी असेल त्यावेळी ही कामे करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे.
पुणे रेल्वे स्टेशन येथे एकूण सहा प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी सर्वात लहान असा प्लॅटफॉर्म क्रमांक सहा आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. सिमेंट कॉक्रिटचा असलेला प्लॅटफॉर्म उखडून त्या ठिकाणी फरशी टाकण्याचे काम सुरू आहे. पण, हे काम खूपच संथ गतीने सुरू असून प्रवाशांना त्यामुळे अडचण येत आहे. सहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या गाड्या येतात. त्या गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे गाडीमध्ये बसताना अथवा उतरताना एखादा अपघात देखील होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांची गर्दी असताना प्लॅटफॉर्म उखडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एखादा तुकडा उडून प्रवाशांना देखील लागण्याची भिती आहे. तसेच, प्लॅटफॉर्म उखडल्याचा राडारोडा त्या ठिकाणीच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर संपविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
“प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर नवीन फरशी टाकण्याबरोबरच नवीन शेड टाकण्याचे काम करण्यात येत आहे. सध्याचे शेड नॉन स्टॅंडर्ड असल्यामुळे ते नवीन करण्यात येत आहे. ऑक्टोंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सरू आहेत. प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल अशी आमचे प्रयत्न आहेत.” -डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी





