महाराष्ट्रात उष्णतेची लाट : अकोल्यात सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद, नागरिक हैराण!

मुंबई – राज्यात सध्या तापमानाचा पारा चढत असून, उष्णतेने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. बहुतांश भागांत तापमान ३५ ते ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर काही ठिकाणी ४२ ते ४३ अंशांवर गेले आहे. हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, अकोल्यात आज राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. चंद्रपूरही मागे नाही, तिथे ४३.६ अंश तापमानाने यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला. या उष्णतेमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
हवामान खात्याच्या अहवालानुसार, अकोल्यात आज या हंगामातील सर्वाधिक तापमान ४४.२ अंश नोंदले गेले, तर काल ते ४३.२ अंशांवर होते. चंद्रपूरमध्ये ४३.६ अंश तापमानाने नागरिकांना हैराण केले. हिंगोलीत तापमान ४१ अंशांवर पोहोचले, तर परभणीत गेल्या दोन दिवसांत तापमान ४० वरून ४१.०३ अंशांवर गेले. सलग दोन दिवस चाळीशी पार गेलेल्या तापमानामुळे परभणीत दुपारी रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नागरिक रुमाल, टोपी घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत.
अकोल्यात सूर्य आग ओकतोय!
अकोल्यात सध्या उष्णतेचा प्रकोप शिगेला पोहोचला आहे. आज ४४.२ अंश तापमानाने यंदाचा उच्चांक गाठला. कालही अकोला ४३.२ अंशांसह राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले होते. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसत असून, जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या पाच दिवसांतील अकोल्याचे तापमान पाहता उष्णता सातत्याने वाढत आहे: ३ एप्रिल – ३७.१, ४ एप्रिल – ३९.०, ५ एप्रिल – ४१.७, ६ एप्रिल – ४३.२ आणि ७ एप्रिल – ४४.२ अंश.
कोणत्या शहरात किती तापमानाची नोंद
अकोला 44.2 , अमरावती 43.6, यवतमाळ 42, वर्धा 42, नागपूर 42.4, चंद्रपूर 43.6, गोंदिया 40.6. तर जळगाव आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात आज सर्वाधिक तापमान परभणीत नोंदवले गेले. 40.7 तापमानाची नोंद आज परभणीत झाली आहे. छत्रपती संभाजी नगर 40.2 अंशावर आहे. लातूर धाराशिव मध्ये 39.2 अंश सेल्सिअस तापमान आहे. पुण्यात आज 39.2 अंश सेल्सिअस तापमान होते. तर सोलापुरात 41.4. नाशिक 40.2 सांगली कोल्हापूर सातारा 38 ते 38.5 अंश ठाणे पालघर 37 व 36 अंश सेल्सिअस वर होते.
काळजी कशी घ्यावी?
अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्णतेपासून बचावासाठी सूचना जारी केल्या आहेत:
-अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
-डोक्याला सुती कापड किंवा उपरणे बांधा.
-डोळ्यांचे संरक्षणासाठी सनगॉगल्स वापरा.
-थंड पाण्याची बाटली सोबत ठेवा.
-भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी आणि शीतपेयांचा वापर करा.
दरम्यान, उष्णतेचा हा कहर कधी ओसरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

