लंडनमध्ये उष्णतेचा कडका ; 30 अंशांच्या पुढे तापमान

लंडन – लंडनमध्ये पारा प्रचंड चढला आहे. लंडनमधील तापमान बऱ्याच वर्षांनी 30 अंशांच्या पुढे गेले आहे. तेथील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या उकाड्याचा असह्य त्रास व्हायला लागला आहे.
ब्रिटनच्या राजघराण्याच्या रॉयल गार्डनाही या प्रचंड उकाड्याचा त्रास झाला आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या रॉयल गार्डच्या संचलनाची तालीम करत असताना तीन रॉयल गार्डना उष्माघाताचा त्रास झाला आहे. रॉयल गार्डमधील हे तीन सैनिक संचलनाचा सराव करत असतानाच गेरी येऊन कोसळले आणि त्यांना स्ट्रेचरवरून न्यावे लागले आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रॉयल गार्डच्या या संचलनाला ब्रिटनमध्ये विशेष महत्त्व आहे. तेथे या संचलनाला “कोलोनेलस रिव्ह्यू’ म्हणून संबोधले जाते. या संचलनामध्ये राजघराण्याच्या रॉयल गार्डच्या 1,400 सैनिकांची तुकडी संचलनात भाग घेत असते. या संचलनामध्ये पायदळाबरोबर घोडेस्वारदेखील सहभागी होत असतात.
राजघराण्याचे वारस आणि स्वतः राजे या संचलनाचे निरीक्षण करण्यासाठी उपस्थित असतात. ब्रिटनचे राजे हे या वेल्स गार्डचे मानक कर्नल असतात. युवराज विल्यम्स यांनी उष्माघात झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सकाळी झालेल्या या संचलनाच्या सरावामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी या सैनिकांना धन्यवाददेखील दिले आहेत.





