Heat wave । लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज ५७ जागांसाठी मतदान पार पडत आहे. राजकीय वातावरण गरम होत असताना मतदानाला तापमानवाढीची झळ बसत आहे. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानासाठी ड्युटीवर असलेल्या १८ कर्मचाऱ्यांचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू Heat wave । भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्यावर गेला आहे. दिल्लीत तर ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या १८ मतदान कर्मचाऱ्यांचा उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील यामध्ये बिहारमध्ये उष्णतेमुळे १० मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतंय. मिर्झापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान केंद्रावर तैनात केलेल्या तीन कर्मचाऱ्यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आता शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं प्रशासनाने सांगितलं. परंतु, या भागातील उष्णतेच्या लाटेमुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येच आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. स्ट्राँग रुमसाठी तैनात अधिकाऱ्याचा मृत्यू Heat wave । दरम्यान, रायबरेली आणि सोनभद्र येथेही ईव्हीएम स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच बिहारमध्ये, गेल्या २४ तासांत उष्णतेमुळे मृत्यू झालेल्या १४ लोकांमध्ये १० मतदान कर्मचारी होते. बिहारमधील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं की, माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १० निवडणूक कर्मचारी आणि इतर चार लोकांचा समावेश आहे. यामध्ये भोजपूर जिल्ह्यातील पाच निवडणूक कर्मचारी, रोहतास जिल्ह्यातील तीन निवडणूक कर्मचारी, कैमूर जिल्ह्यातील एक निवडणूक कर्मचारी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक निवडणूक कर्मचारी आणि अन्य चार जणांचा समावेश आहे. हेही वाचा पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे फेकली पाण्यात ; आयोगाने मागितला अहवाल,व्हिडीओ व्हायरल