हृदयद्रावक! वडिलांच्या गाडीखाली चिरडून चिमुरड्याचा मृत्यू

लोणावळा – कार पार्क करताना वडिलांच्या कारखाली सापडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास लोणावळा येथे घडली. किआंश किरण माने (वय तीन, रा. साने चौक, चिखली) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. किरण राजकुमार माने (वय 28) असे वडिलांचे नाव आहे.
याप्रकरणी दिपक शिवाजी वारंगुळे (वय 28, रा. आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसांना कळविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास लोणावळा येथील मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या हॉटेल ऑर्चिडच्या पार्किंगमध्ये किरण माने हे त्यांची (एमएच 14 जेएच 9000) ही गाडी पार्क करत होते.
त्यांच्या गाडीपुढे खेळणाऱ्या किआंशकडे त्यांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे याच्या अंगावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही बाब लक्षात येताच त्यास जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे.





