Chhatrapati Sambhajinagar : सांभाळ करणाऱ्यांची मनाला चटका लावणारी एक्सिट; चांदगुडे कुटुंबातील सदस्य झाला पोरका
Chhatrapati Sambhajinagar : या घटनेत आता कौटुंबिक वादाचा अँगल समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलेल्या दुर्देवी घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. मुलगा कुणाल मुरलीधर चांदगुडे, वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे या तिघांचा तिसगावच्या खवड्या डोंगरावरून कोसळून मृत्यू झाला. या घटनेत आता कौटुंबिक वादाचा अँगल समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या घरात चांदगुडे कुटुंब वास्तव्यास होते, त्या घरातील एक सदस्य पोरका झाला आहे.
हा सदस्य म्हणजे त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा शेरु आहे. त्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्ती त्याला न दिसल्याने तो एकटाच ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी त्यांची वाट पाहत होता. आपल्या माणसांच्या आवाजाची, त्यांच्या सहवासाची आणि रोजच्या सवयींची त्याला सवय झाली होती. अचानक सगळेच निघून गेल्याने शिरू अस्वस्थ झाला आहे.
कुणालची आई संगीता चांदगुडे या यूट्यूबर होत्या, हे आता समोर आले आहेत. त्यांच्या चॅनेलवरील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संगीता यांनी कौटुंबिक वाद असल्याचे व्हिडिओमधून सांगितले आहे. याशिवाय अजून काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओत शेरु हा पाळीव कुत्रा दिसत आहे. कुणाल आणि त्याची आई संगीता यांच्यासोबत शेरू सर्वाधिक वेळ असायचा. कुणाल त्याची विशेष काळजी घेत असे, असे व्हिडिओमधून दिसत आहे.
श्वानप्रेमी व्यक्ती किंवा संस्थेने पुढे यावे
तसेच संगीता यांच्याशीही शेरूची चांगलीच जवळीक होती. शेरू संगीता यांच्या आसपास राहायचा. कुटुंबातील लहान मुलाप्रमाणेच त्यांचे संगोपन केले जात असल्याचे शेजाऱ्यांच्यानी सांगितले. संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर शेरू सध्या घरात एकटाच आहे. त्याला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज आहे. कुटुंबातील तिन्ही व्यक्तींच्या जाण्यानंतर त्यांच्या मागे राहिलेला हा मुका जीव आता कुणाच्या तरी आधाराच्या प्रतीक्षेत आहे. शेरूची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी श्वानप्रेमी व्यक्ती किंवा संस्थेने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






