Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shivsena Symbol Hearing In Supreme Court: न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

Shivsena Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज 30 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते आणि याच याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी अंतिम युक्तिवादाबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून 2022 मध्ये फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी 2023 मध्ये याचिका दाखल केली होती.
तसेच गद्दार आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही याचिकांवर गुरुवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहेत.
आतापर्यंत काय घडलं?
जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदारांसह बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. फेब्रुवारी 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले.
तर ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे नवीन चिन्ह देण्यात आले. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 आयोगाच्या निर्णयास ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान, मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार देण्यात आला. तसेच अंतिम निकालापर्यंत शिंदे गटास चिन्हाचा वापर करण्यास मुभा देण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आज शिवसेना चिन्ह आणि पक्ष याबाबत सुनावणी पार पडली जाणार आहे.
हेही वाचा:
PMC News: थेट सरसंघचालकांना पत्र! अरविंद शिंदेंच्या लेटर बॉम्बने भाजपमध्ये खळबळ…काय आहे पत्रात?






