Nagar | मुरकुटेंच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

नगर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात राहुरी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जामिनासाठी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतू, फिर्यादी पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे. यावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे, अशी माहिती मुरकुटे यांचे वकिल अॅड. सुरेश लगड यांनी दिली.
अनेक आमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याच्या आरोप करत पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच सोमवारी (7 ऑक्टोबर) मध्यरात्री राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानावरून ताब्यात घेत अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
त्यांच्या वतीने अॅड. लगड यांच्यासह अॅड. महेश तवले काम पाहत आहे. या अर्जावर सरकारी पक्षाने लेखी म्हणणे सादर केले आहे.
काल, शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी फिर्यादीच्या वकिल ए. डी. गर्जे यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी देखील म्हणणे मांडण्यास मुदतवाढ मागितली होती.
दरम्यान, न्यायालयाने शेवटच्या संधीवर फिर्यादी पक्षाला म्हणणे सादर करण्यात मुदतवाढ देत पुढील सुनावणी 22 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.




