चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्यास बांगलादेश न्यायालयाचा नकार

ढाका – बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले हिंदू धार्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्यास तेथील न्यायालयाने नकार दिला आहे. पूर्वी निश्चित केल्याप्रमाणे या जामीन अर्जावरील सुनावणी २ जानेवारी रोजीच होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. दास यांच्यावतीने न्यायालयात अर्ज सादर करणाऱ्या वकिलाला दास यांच्यावतीने बाजू मांडण्याचा अधिकार नसल्याचे कारण देऊन चट्टग्राम महानगर सत्र न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली.
दास यांच्या जामिन अर्जावरची सुनावणी लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ऍड. रबिंद्र घोष यांनी दाखल केली होती. मात्र घोष यांना दास यांचे प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार नाही, असे अन्य वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने घोष यांची याचिका फेटाळली.
दास हे मधुमेह, दमा आणि इतर समस्यांनी ग्रस्त असताना खोट्या आणि बनावट प्रकरणात अटक करण्यात आली असल्याचे घोष यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. दास यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी तुरुंगात जाऊन वकिलपत्रावर त्यांची स्वाक्षरी न घेतल्याचे त्यांनी मान्य केले.
धमक्या आणि राजकीय हेतूनी प्रेरित वकिलांकडून दबाव येत असल्यामुळे दास यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी कोणीही वकिल पुढे येत नव्हते. असे सम्मिलिता सनातनी जागरण जोते या संघटनेने म्हटले होते. पूर्वी इस्कॉनशी संबंधित असलेल्या दास यांना २५ नोव्हेंबर रोजी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेचे देशात आणि परदेशात मोठे पडसाद उमटले आहेत.





