मोठी बातमी…! शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हावर दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तारीख ठरली?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंडखोरी करत आपली शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता.
दरम्यान, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले होते. आता दीड वर्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील पक्ष-चिन्हाबाबत सुनावणी पार पडणार आहे.
शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर कोर्टात बुधवारी (७ मे) सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर फैसला होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह प्रकरणावरील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही तारीख देखील नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर जवळपास दीड वर्षानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ही सुनावणी लांबत गेली आहे.
शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने वेगवेगळे चिन्ह दिले होते. मात्र, पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेंच्या बाजुने फैसला दिला होता.
उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण या प्रकरणी सप्टेंबर २०२३ पासून सुनावणी झालेली नाही. दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी ७ मे रोजी कोर्टासमोर लागलेले आहे. त्यामुळे आता ७ मे रोजी तरी हे प्रकरण सुनावणीसाठी येते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या पुढे ही सुनावणी होणार आहे.





