नवी दिल्ली – कर्नाटकात शाळांमध्ये हिजाब वापरण्यास अनुमती नाकारण्याचा जो निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे त्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शवली असून होळीनंतरच यावर सुनावणी घेतली जाणार आहे.
सरन्यायाधिश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय दिला. ज्या विद्यार्थ्यांनी ही याचिका सादर केली आहे त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना त्यांच्या वकिलांनी यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. यातील अनेक विद्यार्थिनींना लवकरच परिक्षांनाही समोरे जायचे असल्याने त्यावर तातडीने निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती.
त्यावर सुट्टीनंतर विचार करू आम्हाला थोडा वेळ द्या असे सरन्यायाधिशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सांगितले. कर्नाटक हायकोर्टाच्या निकालामुळे याचिकाकर्त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.