पाउस, पोषक वातावरणामुळे ‘हेल्दी’ भातशेती!

शेतकऱ्यांत समाधान : शेतीशाळा, चारसूत्रीवर कृषी विभागाची “मात्रा’

पानशेत – दमदार पावसामुळे भातपिकाची जोमात वाढत आहे. काही दिवस ओढ दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मावळात पावसाची दमदार सरींमुळे भातपिकाने “बाळसं’ धरले. पवन, आंदर व नाणे मावळात इंद्रायणी, फुले समृद्धी या मुख्य वाणाबरोबरच पार्वती, सोनम, पवना तसेच काही स्थानिक वाणाचे भात निसवले (ओंबीवर) आहेत. यंदाचा समाधानकारक पावसामुळे मावळ तालुक्‍यातील भातपीक “हेल्दी’ असल्याचे “रिपोर्ट’ कृषी विभागाने दिला आहे. पुन:र्लागवडीनंतर पिकाची योग्य फुट झाल्याने पिकाची चांगली वाढ आणि त्यामुळे भाताच्या ओंब्याचा बहर सुरू झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

मावळ तालुका हा भाताचे आगार असून, बहुतेक शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पीक चांगले यावे याकरिता यंदा शेतकऱ्यांनी भात लागवडीकरिता चारसूत्री तंत्रज्ञान वापरले होते. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर ठरले आहे.

तालुक्‍यात यंदा 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याशिवाय कृषी विभागाने चारसूत्री, कीड नियंत्रण राखण्यासाठी शेतीशाळेचा प्रयोग आता “हेल्दी’ आणि उत्तम वाढीसाठी यशस्वीचा मार्ग ठरला आहे. पवन, नाणे आणि आंदर या प्रमुख तीन विभागात भात पिकाची लागवड ही टप्प्या-टप्प्याने होत असते. त्यामुळे अंदाजे दोन महिने लागवड सुरू असते. सुरवातीला लागवड झालेल्या पीक भाताच्या ओंब्याचा बहर सुरू झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना आवाहन
सद्यस्थितीमध्ये काही भागात भातपिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव आहे. तरी या रोगावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. यामध्ये कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड 25 ग्रॅम, स्ट्रेप्टोसायक्‍लीन 5 ग्रॅम व 10 मिली स्टीकर हे 10 लीटर पाण्यात एकत्र मिसळून फवारणी करावी. याशिवाय कॉपरहायड्रॉक्‍साईड 30 ग्रॅम 10 मिली स्टीकर 10 लीटर पाण्यात एकत्र मिसळून फवारणी करावी. ही फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करण्यात यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

769 शेतकऱ्यांचे अर्ज…
उन्नत शेती, समृद्ध शेती मोहितेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी मावळ तालुक्‍यात 769 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. या अभियानांतर्गत 58.43 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ट्रॅक्‍टरसाठी 386, पॉवर टीलर 75, ट्रॅक्‍टर अवजारेकरिता 308 अर्ज कृषी विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार 20 लाख रुपये ट्रॅक्‍टरसाठी, 3.40 लाख पॉवर टीलरसाठी आणि 35.03 लाख रुपये ट्रॅक्‍टरची आणि अन्य शेतीउपयोगी अवजारांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

मावळ तालुक्‍यात 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झाली आहे. समाधानकारक पावसामुळे भातपीक जोमात वाढत आहे, याशिवाय अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी पिकासाठी पोषक ठरताहेत. तरीही काही भागात पिकावर कडाकरपा रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून गावोगावी शेती कार्यशाळेच्या माध्यमातून औषध फवारणीबाबत जागृती केली जात आहे.
– देवेंद्र ढगे, कृषी अधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here